डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 15, 2025 7:49 PM | Maharashtra | Rain

printer

राज्यात पावसाचा जोर, अनेक भाग जलमय

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुणे शहरात काल झालेल्या पावसाचा फटका विमानसेवेला बसला. आज सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात येणारी १४ विमानं अहमदाबाद, हैदराबाद, सूरत, मुंबई या विमानतळांवर उतरवण्यात आली. तर पुणे विमानतळावरची तीन उड्डाणं माघारी उतरली. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरही विमानफेऱ्यांना विलंब दिसून आला. हवेली तालुक्यामध्ये थेऊर गावात ओढ्याला पूर आल्याने अडकलेल्या दीडशे जणांना वाघोली अग्निशमन दल आणि पीडीआरएफच्या पथकांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं.

 

अहिल्यानगरमध्ये पाथर्डी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे करंजी, मढीसह अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. कल्याण–विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग, बारामती–छत्रपती संभाजीनगर काही राज्य महामार्ग तसंच पाथर्डी–बीड राज्य महामार्ग बंद करण्यात आले आहेत.

 

सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन आणि उडीद पिकाचं नुकसान झालं आहे.

 

लातूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे तेरणा धरणाचे १२ दरवाजे तर मांजरा धरणाचे ४ दरवाजे उघडले असून नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. औसा तालुक्यात उजनी गावामध्ये तेरणा नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने काही जणांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. नदीकाठच्या शेतातही पुराचं पाणी घुसल्याने पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.

 

बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक मोठ्या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नद्यांना पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर सात गावांमध्ये मिळून ५१ जण पुरात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. आष्टी तालुक्यात ५ ते ६ गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली असून हवाई दलाच्या मदतीने गावांतल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं जात आहे.

 

जालना जिल्ह्याच्या बहुतांश भागात आजही जोरदार पाऊस झाल्याने पिकं पाण्याखाली गेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

 

नागपूर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

 

राज्यात परतीच्या पावसामुळे खरीपाचा हंगाम वाया गेला असून सरकारने बाधित शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.