जोरदार पावसामुळे राज्यातल्या काही भागात पूर परिस्थिती आणि पडझडीच्या घटना घडल्या आहेत. पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसराला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच प्रशासनातर्फे NDRF आणि SDRF यांना आपत्कालीन परिस्थितीकरता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव, लोहा या चार तालुक्यातील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नदीकाठच्या गावातल्या लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आलं आहे.
लेंडी प्रकल्प क्षेत्रातली बाधित असलेली हसनाळ, बोरगाव ही गावं पुन्हा पाण्यात बुडाली आहेत. नांदेड – हैदराबाद राज्य महामार्गावरून वाका या ठिकाणी पुराचं पाणी वाहत आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात काही ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी वाहत असल्यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून उर्ध्व मानार धरणाचे ७ दरवाजे उघडले आहेत.
लातूर जिल्ह्यात अहमदपूर आणि उदगीर तालुक्यांमध्ये चोबळी नदीसह अनेक नद्यांना पूर आल्यामुळे वायगाव पाटी ते गादेवाडी आणि आतनूर ते देऊळवाडी हे रस्ते बंद झाले आहेत. निलंगा तालुक्यात कलांडी गावात रात्रभर झालेल्या पावसामुळे पहाटे दोन घरे पडली.
मांजरा प्रकल्प क्षेत्रातही मोठा पाऊस झाल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, पाच हजार २४१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४७५ पूर्णांक आठ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला आहे. सर्वाधिक ५७४ पूर्णांक चार मिलिमीटर पावसाची नोंद वाशी तालुक्यात झाली आहे. जालना जिल्ह्यातही काल रात्री बहुतांश भागात पाऊस झाला. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस असून, नदी – नाल्यांना पूर आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात सध्या ४९ हजार ४२६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, १८ दरवाजातून ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे.
भंडारा जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज पावसानं सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे तर धानाला नवसंजीवनी मिळाल्यानं शेतकरी आनंदात आहेत. गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.