राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या बोरगाव बुद्रुक, धडकनाळ आणि टाकळी या पूरग्रस्त गावांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयना धरणाचे दरवाजे गुरुवारी सकाळी १३ फुटांवरून ११ फुटापर्यंत खाली आणण्यात आले.
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. या भागातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. वारणा धरणातून आज सकाळी पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून, कोयना धरणातून दुपारी पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनानं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणातून तापी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच तापी नदीला पूर आला आहे. प्रकाशा बॅरेजचे १२ दरवाजे, तर सारंगखेडा बॅरजचे १० दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भाच्या अनेक भागांत गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत असून, चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बल्लारपूर–विसापूर, विसापूर–हडस्ती माना मार्गावर पाणी आल्यामुळे काल हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पुरामुळे शेतीचं नुकसान झालं असून, त्याचे पंचनामे सुरु आहेत.