राज्यात मुंबई आणि रत्नागिरीत पावसाचा जोर आज सकाळपासून ओसरू लागला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातल्या राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
नवी मुंबई क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण १०० टक्के भरले आहे. आज पहाटे मोरबे धरणाचे दरवाजे २५ सेंटिमीटर उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असं आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलं आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. नालासोपारा, वसई, विरार भागात आज देखील सखल भागात पाणी साचलं असून अनेक भागातून नागरिकांना बाहेर काढून निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून धरणाच्या ७ स्वयंचलित दरवाजांपैकी ४ दरवाजे बंद झाले आहेत. अलमट्टी धरणाचा विसर्ग आज सकाळी ९ वाजल्यापासून वाढवण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढला आहे. कोयना धरणासह जिल्ह्यातली इतर धरणं ९५ टक्क्यांच्या वर भरली असून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. सातारा शहरात काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी कृष्णा नदी धोक्याच्या पातळीच्या वरूनच वाहत आहे. सांगलीतल्या काही भागातल्या नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिकमध्ये काल रात्रीपासून पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने आज सकाळी आठ वाजल्यापासून गंगापूर, दारणा, इत्यादी अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. विसर्ग सुरू झाल्यानं गोदा काठालगत आठवडे बाजाराला प्रतिबंध करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. काटेपूर्णा धरणाचे दहा दरवाजे उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात सेलु तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नद्या-नाल्यांचा पूर कायम आहे. भामरागड तालुक्यात राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. पुरामुळे राष्ट्रीय महामार्गासह ११ मार्गांवरील वाहतूक ठप्पच आहे. तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने सिरोंचा तालुक्याला पुराचा धोका वाढला असून, तेथे बचाव पथक तैनात ठेवण्यात आलं आहे.
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली.
हवामान विभागाने उद्यासाठी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून ठाणे, पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. राज्यातल्या अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. पूरपरिस्थितीमुळे राज्यात गेल्या २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं आहे.