गेल्या चार दिवसांत महाराष्ट्रात पाऊस आणि पूर संबंधित घटनांमुळे किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि महाराष्ट्राच्या इतर भागात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. पुराचा गंभीर परिणाम असलेल्या नांदेड जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सुमारे 300 मिमी विक्रमी पाऊस झाला असून त्यामुळे शहरातील सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे.
हवामान खात्याने आज विदर्भ प्रदेशाला रेड अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, पुणे आणि मुंबई दरम्यानच्या सर्व गाड्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांनी आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कराड तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा आज आणि उद्या बंद राहतील.
मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर सुमारे 350 जणांना वाचवण्यात आलं. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत, त्यामुळे कोयना नदीच्या पात्रात 93 हजार 200 क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. धरणातून अचानक पाणी सोडल्यास सार्वजनिक सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.