राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला असून यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे.
राजधानी मुंबई आणि परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात २ जणांचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले.
आज सकाळी साडे ८ वाजता संपलेल्या २४ तासात सांताक्रूझ वेधशाळेत २४४ मिलिमीटर तर कुलाब्यात ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझमध्ये ऑगस्टमध्ये एका दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसाचा हा गेल्या ५ वर्षातला विक्रम आहे. यापूर्वी ४ ऑगस्ट २०२० रोजी २६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. विक्रोळी, सांताक्रूझ, शीव आणि जुहू या परिसरांमध्ये २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. वांद्रे, भायखळा इथं दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. आज सकाळपासून भायखळ्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळं मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं आहे. यासंदर्भात मुंबई हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी अधिक माहिती दिली…
राज्यात इतरत्रही पावसाचा जोर असून ठिकठिकाणच्या जलाशयांमधे पाण्यात वाढ झाली आहे.
पालघर जिल्ह्यातल्या पालघर आणि बोईसर शहरात जोरदार पाऊस सुरू आहे.
धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव शंभर टक्के भरला आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्प भरले आहेत.
सोलापुरात पावसामुळे हिप्परगा तलाव तसंच बार्शी-सोलापूर मार्गावर आगळगाव इथला चांदणी तलाव भरून वाहू लागले आहेत. याचा तडाखा आसपासच्या सहा गावांना बसला असून त्यांचा संपर्क तुटला आहे.
अमरावतीमध्ये तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी नजीक असणाऱ्या टेकडीचा काही भाग रस्त्यावर कोसळला. तर अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण जिल्ह्यात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
लातूर, धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेलं मांजरा धरण ९०% भरलं आहे. आज दुपारनंतर या धरणाचे ४ दरवाजे काही प्रमाणात उघडले आहेत. नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे, नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, असं प्रशासनानं सांगितलं आहे.
गडचिरोलीमध्ये नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे ४ मार्गांवरील वाहतूक बंद आहे. गेल्या चोवीस तासांत सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक ११६ पूर्णांक ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर अहेरी तालुक्यात ९२ मिलिमीटर पाऊस पडला.
सांगलीमध्ये आज दुपारी आलेल्या जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरीमध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
वाशिम जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसानं सोयाबीन, हळद या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. रिसोड तालुक्यातल्या वाडी रायताळ इथं नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेल्याचा एकाचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला.
हिंगोली जिल्ह्यात ८ गावांचा संपर्क तुटला आहे. ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं धरणाचे २ दरवाजे नव्याने उघडण्यात आले असून ७ दरवाज्यांतून ११ हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे.