नाशिकमध्ये घाट परिसरांत गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्यानं गंगापूर धरण ७३ टक्क्यांपेक्षा जास्त भरलं आहे. आज सकाळी ११ वाजता गंगापूर धरणातून ६०३ क्युसेकचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
धुळे जिल्ह्यातही दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पांझरा, मालनगाव आणि जामखेडी हे मध्यम प्रकल्प पूर्ण भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तिथून पांझरा नदीवरच्या अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यानं त्यातून आज ५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला गेला. त्यामुळे धुळे शहरातला फरशी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पांझरा नदीच्या दोन्ही काठावरच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं बहे, नागठाणे, डिग्रज,सांगली आणि म्हैशाळ असं पाच बंधारे कृष्णा नदीच्या पाण्याखाली गेले आहेत. नागठाणे- शिरगाव बंधारा पाण्याखाली गेल्यानं शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना लांबच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. दुधोंडी इथं प्रथमच यावर्षी कृष्णा नदी पात्राच्या बाहेर वाहात आहे.
पुणे जिल्ह्यात खडकवासला तसंच वरसगाव धरणातुन मुठा नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गात संध्याकाळी ७ वाजता वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
सातारा जिल्ह्यातला पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणारी आवक कमी झाली आहे. यामुळे आजपासून कोयना, कण्हेर, धोम, धोम- बलकवडी धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या कोयना धरणात सुमारे ८५ टीएमसी पाणीसाठा असून येथून 25 हजार 600 क्युसेक विसर्ग सुरू आहे.