राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर अजून कायम आहे. नद्यांचे प्रवाह वाढले असून धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीने धोका पातळी ओलांडली आहे.
पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना धरणातून नियंत्रित विसर्ग चालू असून जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यात भातसा धरण परिसरात मुसळधार पावसामुळे पिसे पम्पिंग स्टेशनच्या तलावात मोठ्या प्रमाणात चिखल, आणि झाडांच्या फांद्या साचल्या आहेत. तलावातला कचरा काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे ठाणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद आहे. पुढले दोन दिवस ठाणे शहराला अपुरा पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाणी उकळून प्यावं आणि पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलं आहे.
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे एका शेतातली झोपडी कोसळून झालेल्या अपघातात एक जण मृत्युमुखी पडला. ठाणे तहसीलदार कार्यालयानं मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
रायगड जिल्ह्यातील कुंडलीका नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परभणी जिल्ह्यात हादगाव पाथरी येथे २० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं होतं.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं भूस्खलनाच्या अनुषंगाने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, तापोळा महाबळेश्वर रस्ता सुरक्षास्तव बंद ठेवला आहे.
रायगड जिल्हा आणि पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.