January 30, 2025 8:08 PM | MPSC

printer

लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं MPSC चं स्पष्टीकरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असून उमेदवारांनी अपवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आयोगाच्या सचिव  डॉ. सुवर्णा खरात यांनी केलं आहे. त्या नवी मुंबई इथं पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. येत्या रविवारी २ फेब्रुवारी ला   ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’ होणार आहे. त्याची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचं वृत्त पुण्याच्या एका दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाने हा खुलासा केला आहे. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे  तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित असून उमेदवारांनी अशा प्रकरणांमुळे विचलित न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. तसंच असे दूरध्वनी आल्यास contact-secretay@mpsc.gov.in या ईमेलवर तक्रार दाखल करावी, असं आवाहन आयोगानं केलं आहे.

राज्यभरात  ८६९ केंद्रांवर ६ विभागांमध्ये परीक्षा होणार आहे. त्यासाठी २ लाख ८६ हजार उमेदवार  परीक्षेला बसणार आहेत.