डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रसरकार अतिवृष्टीग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन

महाराष्ट्रातल्या आपद्ग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. राज्यातल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना दिली. त्यावेळी  प्रधानमंत्र्यांनी हे आश्वासन दिल्याचं फडणवीस यांनी माध्यमांना सागितलं. याशिवाय, महाराष्ट्रातले संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, मुंबईत दहिसर इथल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचं हस्तांतरण तसंच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने राज्य सरकार करत असलेले उपाय इत्यादींबाबत अतिशय सविस्तर चर्चा प्रधानमंत्र्यांशी केल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.  गडचिरोली इथं पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, हा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी मोदी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीत पोलाद उत्पादनाची प्रचंड क्षमता असून, हे पोलाद हरित पोलाद असेल आणि चीनपेक्षाही कमी किंमतीत हे पोलाद उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीत जिल्हा नक्षलमुक्त करुन विकासाच्या अमाप संधी यातून निर्माण होणार आहेत. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

राज्यात 10 शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने आहेत.  भारताला लागणार्‍या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी 30 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतं. त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तीन संरक्षण कॉरिडॉरसंदर्भात एक तपशीलवार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी प्रधानमंत्र्यांना दिलं. पुणे- अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर, अमरावती- वर्धा- नागपूर- सावनेर, आणि नाशिक – धुळे या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात  रोजगार निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईत दहीसर इथल्या 58 एकर जागेची मालकी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. तिचं हस्तांतरण महानगरपालिकेकडे झाल्यास जागेचा सार्वजनिक वापरासाठी आणि विकासासाठी उपयोग करता येईल, असं ते म्हणाले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-3 या प्रकल्पांचा प्रारंभ करतील. तसंच मुख्यमंत्र्यांनी राज्याचे माजी राज्यपाल आणि विद्यमान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचीही भेट घेतली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.