ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव, या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना शाल, पुष्पगुच्छ, तसंच प्रत्येकी सव्वा दोन कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केलं. तर या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना साडेबावीस लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं. तर सर्व महिला क्रिकेट संघाचा सहाय्यक कर्मचारी वर्गालाही ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
महिला क्रिकेट संघाचा विश्वचषक कायम ठराविक देशाकडे जायचा. यंदा हा विश्वचषक भारताकडे आल्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाठिंबा असल्याशिवाय विजय मिळवता येत नाही. त्यामुळे संघाचे प्रशिक्षक, सर्व सहकारी आणि मार्गदर्शकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. भारतीय महिला क्रिकेट संघातली सर्व खेळाडू भविष्यात अनेक मुलींसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.