महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस

राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांची, उमेदवारांची तयारी जोरात सुरु आहे. निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. महायुती आणि महाविकास आघाडी स्थानिक घटकांवर जोर देत वेगवेगळ्या तडजोडी करत आहेत तसंच वेगवेगळ्या नेते पक्षांतर करत आहेत. 

 

मुंबईत काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीमधे समेट झाला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवायची ठरवलं आहे. आमदार सना मलिक यांनी आज ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून एकूण १०० जागा लढवणार असल्याचं सांगितलं.

 

रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा महायुतीने द्यावा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. 

 

ऑल इंडिया एमआयएम पक्षाने ठाणे महानगरपालिकेसाठी ५, तसंच वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी ३ उमेदवार जाहीर केले आहेत. आपला पक्ष भिवंडी निजामपूर तसंच तळोजा इथंही उमेदवार देणार असल्याचं पक्ष प्रवक्ते इम्तियाज जलील यांनी सांगितलं. 

 

पिंपरी चिंचवडप्रमाणे पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत अशी  घोषणा आज अजित पवार यांनी केली. पुण्यातही काँग्रेसने बहुजन वंचित आघाडीबरोबर समझोता केला आहे. 

 

जळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ३८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ३७ जागा लढवणार आहे. 

 

सोलापुरात भाजपाबरोबर शिवसेनेची चर्चा निष्फळ ठरली असून तिथं राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं पक्ष प्रवक्ते सिद्धराम म्हेत्रे यांनी सांगितलं. 

 

अमरावतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.