प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या लोककल्याणकारी कारभारावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेलं यश म्हणजे व्यापक हिंदुत्व, पारदर्शकता, समावेशक विकासाला महाराष्ट्रानं दिलेला कौल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं अभिनंदन केलं आहे. ही निवडणूक सोपी नव्हती, अचाट धनशक्ती आणि सत्तेच्या शक्ती विरुद्ध ही शिवशक्तीची लढाई होती, असं त्यांनी म्हटलं आहे. मनसेला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी खचून जाणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला मिळालेलं यश समाधानकारक नसलं तरी आम्ही वैचारिक लढाई लढलो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. तर जनतेचा कौल हा सर्वोच्च असून तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.