राज्यात नैऋत्य मोसमी पावसानं १०७ वर्षांचा विक्रम मोडत वेळेआधीच प्रवेश केला आहे. मुंबईत मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागांत, तसंच रेल्वेरुळांवर पाणी भरलं आहे. विमानांची उड्डाणंही उशिरानं सुरू आहेत. शहरातल्या ९६ धोकादायक इमारतींमधल्या तीन हजारापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. हवामान विभागानं आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढच्या २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
पुढचे काही दिवस मुंबई आणि राज्याच्या अनेक भागांत सतत जोरदार पावसाचा अंदाज असून नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
कोकणात सर्वत्र तसंच सोलापूर, सांगली इत्यादी ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे.
राजधानी मुंबईत कालपासून वादळी पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. सकाळी कार्यालयात जाणाऱ्या नोकरदारांचे त्यामुळे हाल झाले. कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमधे मुसळधारपावसामुळे नद्या भरुन वाहू लागल्या आहेत.