डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराप्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्याचं निलंबन होणार

छत्रपती संभाजीनगर इथं विद्यादीप बालसुधारगृहमधे अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची घटना, अतिशय गंभीर असून, याप्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्याविरोधात कारवाई करत तत्काळ त्याचं निलंबन केलं जाईल, तसेच संबंधित संस्थेची मान्यता देखील रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. आमदार चित्रा वाघ यांनी अल्प सूचना प्रश्नाद्वारे हा मुदा सभागृहात नियमित कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. 

 

या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर, मारहाण करण्यासह अनेक अमानवी पद्धतीने छळ चालू होता. त्यांच्यावर धर्मांतर करण्याचाही दबाव होता, असा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांची समिती स्थापन केली असून, त्यांनी या बालगृहाला भेट दिली असून, अनेक पीडित मुलींशी चर्चा करून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे. उद्या ही समिती आपला अंतिम अहवाल देणार आहे. अहवाल आल्यानंतर, या प्रकरणात, सरकारी यंत्रणेतील जे कुणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहभागी असतील, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

 

मुंबई उच्च न्यायालयानेही अमायकस क्युरे अंतर्गत याची दखल घेत पावले उचलली आहेत, याची माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली. मात्र राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत, गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, तरी राज्य महिला आयोग या गंभीर प्रकरणी कधी कारवाई करणार, अशी टीका दानवे यांनी केली.