मुंबईतल्या डोंगराळ भागात दरड कोसळण्याचं प्रमाण लक्षात घेऊन याबाबत नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल आणि आयआयटी मुंबईने यावर सुचवलेल्या उपाययोजनांनुसार कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतचा मूळ प्रश्न सुनील राऊत यांनी उपस्थित केला होता, त्यावर राम कदम, अजय चौधरी, अशोक पाटील यांनी उपप्रश्न विचारले. २०१७ साली भारतीय भौगोलिक विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण ७४ दरड ग्रस्त ठिकाणं असून त्यातील ४६ ठिकाणं अतिधोकादायक आहेत. त्यापैकी ४० उपनगरात आहेत. आय आय टी मुंबई ने यावर काही उपाययोजना सुचवल्या आहेत, त्यानुसार ४७ कामांपैकी ४५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत, ती म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं करण्यात येतात, असं मंत्री म्हणाले.
अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वेळेवर मिळावं यासाठी मुंबईत शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होणार असून त्यात त्यावर तोडगा काढण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली, याबाबतचा प्रश्न विजय देशमुख यांनी उपस्थित केला होता. जयंत पाटील यांनी त्यावर उपप्रश्न विचारले. राज्यातील अल्पसंख्य शाळांचा दर्जा मिळवण्यासाठी गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनुसार एक समिती स्थापन करून राज्यव्यापी तपासणी मोहीम राबविण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली, याबाबतचा प्रश्न गजानन लवटे यांनी उपस्थित केला होता त्यावर प्रशांत बंब, नाना पटोले यांनी उपप्रश्न विचारले होते.