विधानसभेतल्या विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज पुन्हा उपस्थित केला. न्यायमूर्ती गवई यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रम पत्रिकेत विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख नसल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. यावर, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, नवीन विधानसभेच्या स्थापनेनंतर विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठीचा प्रस्ताव यायला चार महिने लागले, त्यावर निर्णय घ्यायला सुमारे तीन महिने लागणं ही काही मोठी बाब नाही, असं मत व्यक्त केलं. यावर विरोधकांनी थोडा गदारोळ केला. त्यानंतर अध्यक्षांनी लक्षवेधी सूचना पुकारल्या.
विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेत्याची निवड अद्याप झाली नसल्याची बाब सरन्यायाधिशांच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं त्यांना आज याबाबत निवेदन दिलं. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीच्या मुद्द्यावरही लवकर निकाल देण्याची अपेक्षा त्यांनी सरन्यायाधीशांकडे यावेळी व्यक्त केली.