नोकऱ्या मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे मराठा समाजासाठी विविध योजना सुरू केल्या, असं मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं उभारण्यात आली आहेत, सारथी संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला आर्थिक सहाय्य देऊन ते मजबूत करण्यात आलं, मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी आर्थिक मदत दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
अण्णासाहेब पाटील यांनी निस्वार्थपणे जनतेची सेवा केली. माथाडी कामगारांसाठी संघटना उभी केली, त्यांच्यासारखे नेते दुर्मिळ असतात, असं मुख्यमंत्री म्हणाले. माथाडी कामगारांची चळवळ मजबूत करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.