महाराष्ट्रातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात
मुंबई, दि. 04 (रानिआ): निवडणूक होत असलेल्या 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आजपासून नामनिर्देशपत्र सादर करण्यास सुरुवात झाली असून, त्यासाठी 664 उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (Print Out) काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहील.