महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी आहेत, त्यामुळे राज्यात गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत ट्वेंटी-ट्वेंटी गुंतवणूक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत बोलत होते.
धोरणात्मक सुधारणा, पायाभूत सुविधांचा होत असलेला विकास यामुळे महाराष्ट्र हे देशाचं ‘ ग्रोथ सेंटर’ बनलं आहे. मुंबई ही देशाच्या आर्थिक राजधानी सोबतच मनोरंजन, स्टार्ट अपची सुद्धा राजधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातलं गुंतवणुकीचं ‘मॅग्नेट’ही ठरलं आहे, असं ते म्हणाले.
उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची १३ वी बैठकही आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महाराष्ट्र सौर पॅनेल निर्मिती क्षेत्रात देशात आघाडी घेत आहे. या क्षेत्रामध्ये होत असलेल्या भरीव कामामुळे मोठी ‘ग्रीन इको सिस्टीम’ निर्माण होणार आहे. ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्यानं ग्रीन स्टील संदर्भात धोरण तयार करण्यासाठी एक समिती गठित केली जाणार असल्याचं फडनवीस यांनी यावेळी सांगितलं.