डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 18, 2025 3:43 PM

printer

राष्ट्रीय जल पुरस्कारामधे सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली इथं आज झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य विभागात प्रथम पुरस्कारने गौरवण्यात आलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या विभागात गुजरातला द्वितीय तर हरियाणाला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विभागात नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम पुरस्कार पटकावला. 

 

अमृताइतक्याच मौल्यवान असलेल्या जल संसाधनाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, अशी भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केली. भारतीय परंपरेमधे जलस्रोतांना पूजनीय मानलं गेलं आहे. माणूस अन्नाशिवाय काही काळ जगू शकेल, मात्र पाण्याशिवाय जगू शकत  नाही, त्यामुळे पाण्याच्या संवर्धनासाठी काम करणारे कौतुकास पात्र आहेत, असं राष्ट्रपती म्हणाल्या. गेल्यावर्षी सुरू झालेल्या जलसंवर्धन जनसहभाग उपक्रमाद्वारे ३५ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचना उभारल्या गेल्या असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं.

 

देशात मर्यादित जलस्रोत असल्याने त्याचा वापर जपून करायला हवा असं राष्ट्रपती म्हणाल्या. हवामान बदलाचा जलस्रोतांवर परिणाम होत असून जलस्रोतांच्या संवर्धनसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन यावेळी राष्ट्रपतींनी केलं. 

 

या कार्यक्रमात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील, जलशक्ती राजमंत्री व्ही. सोमन्ना आणि राजभूषण चौधरी उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात दहा विभागांमधे ४६ पुरस्कार प्रदान करण्यात आले.