राज्यात काल संध्याकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी नद्यांचे प्रवाह फुगले असून धरणातल्या जलाशयांमधून विसर्ग करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. राजधानी मुंबई आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून येत आहेत. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळे येत आहेत. लातूर सोलापूर अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून ढगफुटी सदृश पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे. परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने सिना कोळेगाव धरणातून ५५ हजार ४४० क्युसेकने सुरू असलेला विसर्ग आज दुपारी दीड वाजता वाढ करून ६० हजार ५०० क्युसेक एवढा करण्यात आला आहे.
कोल्हापुरात काल संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. . मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
सांगली जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात अनेक भागात शेती जलमय झाली असून सोयाबीन, उडीद आणि भुईमूग पिकाबरोबरच डाळिंब, पेरू आणि केळी या फळ पिकांचं नुकसान होत आहे. पालेभाज्यांचंही नुकसान झालं आहे
नांदेड जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा मोठा फटका बसला आहे. नांदेड- हैदराबाद राज्य महामार्गासह प्रमुख रस्त्यावरची वाहतूक थांबली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेड शहरात अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात १ लाख ६० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
वाशीममध्ये चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरु आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग यासह हळद पिकाला सुद्धा या पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.
वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात उद्यासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं कळवलं आहे.