स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराला जोर

राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला २ दिवस शिल्लक आहे. त्यामुळं राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रापूर इथं प्रचारसभा घेतली. विकास आराखडा घेऊन भाजपा जनतेकडे जात आहे. भाजपाकडे निती, नियत आणि निधी असल्याने भाजपाच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन  मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. याशिवाय वाशिम आणि गडचिरोली इथं मुख्यमंत्र्यांनी  प्रचारसभा घेतली. सत्ता आली तर गडचिरोलीला स्मार्ट सिटी बनवू असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं. 

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदगीर इथं प्रचारसभा घेतली. शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. 

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर इथं भाजपाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी तर कन्नड इथं आमदार संजय जाधव यांनी प्रचारसभा घेतली. गंगापूर शहर सक्षम, सुरक्षित आणि सुंदर बनवण्याचा भाजपाचा संकल्प असल्याचं कराड म्हणाले. तर संजय जाधव यांनी कन्नड शहरासाठी कोणकोणती विकासकामं करण्यात येतील याची विस्तृत मांडणी केली.  धाराशिवमधे पालकमंत्र प्रताप सरनाईक यांनी काल शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. 

 

पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार नाहीत तसंच महायुतीतल्या कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी सांगितलं.

 

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधुम सुरू असताना टिटवाळा इथं शिवसेना कार्यकर्त्याची काल रात्री हत्या झाली. चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या हत्येमागे संपत्तीचा वाद किंवा एखादा जुना वाद आहे का किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतल्या वादामुळे ही हत्या झाली आहे का याचा तपास केला जाईल असं पोलिसांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.