महाराष्ट्र फाउंडेशनचे यंदाचे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार अरुण खोपकर यांना, तर समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार नागपुरच्या लीलाताई चितळे यांना मिळाला आहे. २ लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. डॉ नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार पश्चिम बंगालचे मनीष राय चौधरी यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे.
इतर पुरस्कारांमधे ललितसाहित्यासाठी निखिलेश चित्रे यांना, वैचारिक-अंपारपरिक ग्रथपुरस्कार सोलापूरचे विनय नारकर यांना, तर रा. शं दातार नाटयलेखन पुरस्कार पुण्याचे ऋत्विक व्यास यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार गडचिरोलीचे प्राध्यापक जावेद पाषा यांना, तर सामाजिक कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार पुण्याचे दत्ता देसाई यांना मिळाला आहे. ५० हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे.
येत्या १७ जानेवारीला पुण्यात मासूम संस्था आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात डॉ गणेशदेवी यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जातील.