राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विविध धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी प्रकल्पातून सध्या १ लाख २ हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या माऊली प्रतिष्ठानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख १ हजार १११ रुपये दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यात नागुर इथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बालाजी व्यंकट मोरे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जिल्हा प्रशासनाने ४ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
दरम्यान, येत्या २ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.