राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नाही, मात्र दुष्काळासाठी ज्या सवलती लागू केल्या जातात तशाच सवलती लागू केल्या जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फ़डनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते.
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात ६० लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, सरकारने ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाठी २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करायला सुरुवात केली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. पुढच्या दोन तीन दिवसांत नुकसानीची सर्व माहिती राज्य सरकारला मिळेल, त्यानंतर मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारकडे नुकसानीचा अहवाल पाठवला जाईल, मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपदग्रस्तांची मदत करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वसुली न करण्याचे निर्देश बँकांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.