अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना दोन हजार २१५ कोटी रुपये मदत करण्याचे शासन आदेश दिले असून १ हजार ८२९ कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. उर्वरित रक्कम येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मदत जाहीर करण्याची प्रक्रिया निरंतरपणे चालू राहणार असून यापुढेही मदत निधीचे जीआर वितरीत केले जातील, असही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
अहिल्यानगर, सोलापूर, बीड, परभणी या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. आतापर्यंत ९७५ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी पेक्षा १०२ टक्के जास्त पाऊस झाला आहे. पुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. पूरग्रस्त भागात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या सतरा तुकड्या तैनात केल्या आहेत. या भागांचा आढावा घ्यायला मंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना सांगितलं आहे, आपण स्वतः काही भागांना भेट देणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.