अतिवृष्टीमुळे ७० लाख एकरावरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा अंदाज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत व्यक्त केला. जिथे अद्याप पंचनामे झालेले नाहीत किंवा आणखी नुकसानी झालेली असण्याची शक्यता आहे तिथे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवली जाईल असं आश्वासन भरणे यांनी दिलं.
राज्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली असून अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. तसंच पशुधन वाहून घेलं असून घरांचही नुकसान झालं असल्यानं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुढच्या काही दिवसात राज्यात आणखी पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा इशारा असलेल्या भागात जीवित आणि वित्तहानि रोखण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावी असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं, विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणातून सध्या दोन हजार २७२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं असून, धरणात सध्या ९२ हजार ३९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून सध्या एक लाख तीन हजार ७५२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
मांजरा धरणातून ४३ हजार ५१६, माजलगाव धरणातून एक लाख १५ हजार २४३, तर सिना कोळेगाव प्रकल्पातून ७० हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे.