महाराष्ट्रात यंदा जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुढच्या एक वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सर्व बाधित तालुक्यांच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचं मध्यम मुदत कर्जात रुपांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहकार विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.
राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात ३२ हजार कोटींचा विशेष मदतनिधी जाहीर केला होता; त्याचवेळी दुष्काळी उपाययोजना, सवलती लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कर्ज पुनर्गठन आणि वर्षभरासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसंच सहकार आयुक्तांनी परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल याची दक्षता घ्यावी, असंही परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.