शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक, मुख्यमंत्र्यांची भूमिका

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी आज मांडली. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी इतके विविध प्रश्न मांडलेले आहेत, की फक्त आंदोलनाच्या माध्यमातून ते सोडवता येणार नाहीत, त्यावर चर्चा करून रोडमॅप तयार करावा लागेल, त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. आंदोलनात झालेल्या गर्दीमुळे सामान्य नागरिकांना त्रास झाला, त्यामुळे त्यांनी असे प्रकार टाळावेत, रेल रोकोसारखी आंदोलनं करू नये, चर्चेसाठी  यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अनेकदा अशा आंदोलनांमध्ये अनेक घातक प्रवृत्ती शिरतात, त्यापासून सावध राहायला हवं, असा इशारा त्यांनी दिला. 

 

शेतकऱ्यांची कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत या आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी कालपासून आंदोलन सुरू केलं आहे. वर्धा इथून हे आंदोलक काल नागपूरमधे पोहोचले. सरकारने आंदोलक नेत्यांना काल चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं, मात्र कर्जमाफी झाल्याशिवाय कुठलीही चर्चा होणार नाही अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेत आंदोलन सुरू ठेवलं. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडूू यांनी आंदोलनासाठी पुढाकार घेतला असून यात किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष सहभागी झाले आहेत.