आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करता येईल, असं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज सांगितलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत राज्य निवडणूक आयोगाची आज मुंबईत बैठक झाली, त्यावेळी वाघमारे बोलत होते. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगानं २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं नियोजन केलं आहे.
संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे आणि घरोघरी जाऊन संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्याची दक्षता घेण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने maha sec voterlist.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिल्याचं वाघमारे यांनी सांगितलं