राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे नेते मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज रात्री १० वाजता हा प्रचार संपेल.
दरम्यान, राज्यातल्या काही मतदारसंघांमधल्या निवडणुकांबाबत काही जणांनी न्यायालयात धाव घेतल्यानं इथल्या निवडणुका पुढं ढकलायचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. हा निर्णय चुकीचा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. हा निर्णय इतर उमेदवारांवर अन्याय करणारा असून तो कायद्याला धरून नाही, असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचं मत व्यक्त केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या निर्णयावर टीका केली. मतदान एका दिवसावर आलेलं असताना २० नगरपालिका आणि काही प्रभागांमधल्या निवडणुका पुढं ढकलायचा निर्णय आश्चर्यकारक आणि अनाकलनीय असून आयोगाचा भोंगळ कारभार सुरू आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या उद्या होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या चार नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आज निवडणूक पथकं आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना होत आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर आणि फलटण पालिकेची निवडणूक, तसंच मलगापूर पालिकेतल्या २ ठिकाणी न्यायालयाच्या निर्णयानुसार २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातल्या प्रभाग ४ ची निवडणूक उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं स्थगित करण्यात आली आहे.