राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपुष्टात आली. उद्या, मंगळवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता येतील. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदेश पारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची बॉर्डर परिषद झाली. निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचा निर्णय यावेळी झाला.
धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर नगरपरिषदेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज भरले. याशिवाय शिरपूर, दोंडाईचा नगरपरिषद आणि शिंदखेडा नगरपंचायतीसाठीही विविध पक्षांच्या उमेदवरांनी उमेदवार अर्ज दाखल केले.
पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून कैलास म्हात्रे, काँग्रेसकडून प्रतिम राऊत, शिवसेनेकडून उत्तम घरत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उत्तम पिंपळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
भंडारा जिल्ह्यात सर्व राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व पक्षांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. शक्य तिथे काँग्रेस इतर पक्षांसोबत युती करेल, अन्यथा स्वबळावर लढेल, मात्र महाविकास आघाडीचेच सदस्य जास्तीत जास्त निवडून येतील असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. तर भंडारा जिल्ह्यातल्या चारही नगरपरिषदांच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील असं आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
गोंदिया जिल्ह्यातही सर्व पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आज भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
पंढरपूर नगरपरिषद निवडणूकीतून काँग्रेसने आज माघार घेतली. काँग्रेसने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांना पाठिंबा दिल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी आज जाहीर केलं.