मतदारयादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी महाविकास आघाडी आणि काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. विविध विरोधी पक्षांच्या प्रतिनिधीमंडळाची आज मुंबईत निवडणूक आयोगाबरोबर चर्चा झाली, त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या यादीतल्या त्रुटी दूर कराव्या, VVPAT चा वापर करावा, आदी मागण्या विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. यावर या मागण्यांचा सकारात्मक विचार करू, असं आश्वासन निवडणूक आयोगानं दिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार नाही, मतदानाचे सीटीटीव्ही फूटेज दाखवले जात नाहीत, मतदार याद्या विरोधी पक्षांना दाखवल्या जात नाहीत, हे अयोग्य असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मतदार यादीतल्या काही त्रुटी माध्यमांसमोर दाखवल्या. एकाच घरामधे हजारो मतदार असणं, अनेक घरांना क्रमांक नसणं, एकाच मतदाराचं नाव अनेक ठिकाणी असणं, वयाच्या नोंदीत घोळ अशी उदाहरणं पाटील यांनी माध्यमासमोर वाचून दाखवली. निवडणूक आयोगाचं संकेतस्थळ दुसरंच कुणीतरी हाताळत असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला.
निवडणूक आयोगाच्या उत्तरानं आपलं समाधान झालं नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. निकोप निवडणूक लोकांचा अधिकार असून त्यात हस्तक्षेप योग्य नाही असंही ते म्हणाले.
राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग टोलवाटोलवी करत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, शेकापचे नेते जयंत पाटील, माकपचे नेते अजित नवले, भाकपचे सुभाष लांडे उपस्थित होते.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघांच्या यादीत नव्यानं नावं समाविष्ट करणं, अथवा वगळणं किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी काल स्पष्ट केलं.