राज्यातल्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या निवडणुका आयोगाने आज जाहीर केल्या.
या निवडणुकांसाठी १६ जानेवारी पासून अर्ज भरायला सुरुवात होईल आणि २१ जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील. २२ जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. याचदिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करणं, मतदान चिन्ह वाटप होईल. ३ तारखेला मध्यरात्रीपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल आणि ५ फेब्रुवारीला सकाळी साडे ७ ते साडे ५ दरम्यान मतदान होईल. प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी १ आणि पंचायत समितीच्या गणासाठी एक अशी दोन मते द्यावे लागतील.
या निवडणुकीत EVM चा वापर होणार असून विधानसभेच्या मतदार यादीत १ जुलै २०२५ रोजी नाव असलेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येईल. ‘मताधिकार’ या मोबाइल ॲपवरुन मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीत शोधता येईल.
या निवडणुकांमध्ये २ कोटी ९ लाख मतदार असतील आणि त्यांच्यासाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र कार्यरत असतील. यासाठी १ लाख २८ हजार अधिकारी आणि कर्मचारी काम करतील, असं निवडणूक आयोगाने सांगितलं.