सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात महानगरपालिका निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यम प्रतिनिधीना सांगितलं. या निवडणुका महायुती एकत्रच लढवणार असून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असं ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यसरकार लौकरच आपली भूमिका न्यायालयात मांडेल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रशासकीय सुधारणा आणि कार्यक्षमता वाढीच्या उद्देशाने राज्यशासन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा आयोजित करत आहे. त्यादृष्टीनं दीडशे दिवसांचा कार्यक्रम अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. महानगरपालिका अधिकाऱ्यांसाठीच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री पुण्यात होते.
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्किएच्या मालावर बहिष्कार टाकण्याच्या पुण्यातल्या व्यापाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं.