उमेदवारांच्या प्रचारखर्चावर कठोर नियंत्रण ठेवण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. खर्चाची मर्यादा वाढवली असली तरी त्यावर कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी केलेल्या प्रत्येक प्रचार सभा, मेळावा आणि कार्यक्रमाचे छायाचित्र, खर्चाचा तपशील, खर्चाची अधिकृत बिलं जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. रोख खर्चावर मर्यादा ठेवत बँक व्यवहार आणि खर्चाचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. मनपा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चाची कमाल मर्यादा मनपाच्या वर्गवारीनुसार निश्चित केली आहे. त्यानुसार अ वर्ग मनपासाठी १५ लाख रुपये, ब वर्गासाठी १३ लाख रुपये, क वर्गासाठी ११ लाख रुपये तर ड वर्ग मनपेसाठी ९ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खर्चाच्या नोंदीत उशीर झाला किंवा तफावत आढळल्यास उमेदवारांना नोटीस बजावली जाणार असून, गंभीर उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशारा आयोगानं दिला आहे.