राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर झाली. २९ महानगरपालिकांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत यात निवडणुकीसाठी २२७ प्रभाग असतील. नवी मुंबई महानगरपालिकेत २८ प्रभाग असून यात २७ प्रभाग चार सदस्यीय असून एक प्रभाग तीन सदस्यीय आहे, यातून १११ सदस्य निवडले जाणार आहेत. नागपूर मधे एकूण ३८ प्रभाग असतील. यात चार सदस्यीय प्रभाग ३७ तर एक प्रभाग तीन सदस्यीय असेल.
नागपूर महानगरपालिकेत १५१ नगरसेवक निवडले जाणार आहेत. नाशिक महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी नाशिकमधे ३१ प्रभाग असणार आहेत. यात २९ प्रभाग चार सदस्यीय असून २ प्रभाग तीन सदस्यीय आहेत. यातून एकूण १२२ सदस्य निवडले जाणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत २९ प्रभागांतून ११५ सदस्य निवडले जातील. पुणे महानगरपालिकेत ४० प्रभाग चार सदस्यीय आणि एका पाच सदस्यीय प्रभागासह ४१ प्रभाग निश्चित केले आहेत. यातून १६५ सदस्य निवडले जाणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या ३२ प्रभागामधल्या १२८ सदस्यासाठी निवडणूक होईल. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या ३१ प्रभागातून १२२ नगरसेवक निवडले जातील.
नाशिक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची पुनर्रचना करण्यात आली आहे. यानुसार एक गट वाढला असून आता एकूण ७४ गट असतील. तर गणांची संख्याही दोनने वाढून ती १४८ इतकी झाली आहे. बीड, परभणी तसंच इतर जिल्हा परिषदांसाठीही प्रभाग रचना काल जाहीर झाली. या प्रारुपावर ४ सप्टेंबरपर्यंत हरकीत आणि सूचना पाठवता येतील.