डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा

बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी एकूण ४६ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातल्या अडीच कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक घरामागे ३ गॅस सिलिंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीही घोषणा अजित पवार यांनी आज केली. ५२ लाखांहून अधिक कुटुंबांना याचा लाभ होईल. 

 

चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची १०० टक्के प्रतिपूर्ती देण्याचा निर्णयही सरकारनं जाहीर केला. ८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या मुलींना याचा लाभ मिळेल. या निर्णयाचा लाभ २ लाखांहून अधिक मुलींना होण्याचा अंदाज आहे. 

 

अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पिंक रिक्षा योजनेच्या अंतर्गत १७ शहरातल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी सरकार अनुदान देणार आहे. “शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेतल्या लाभार्थी मुलींना देण्यात येणारं अनुदान १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्याचा निर्णयही आजच्या अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. लखपती दीदी अंतर्गत यावर्षी २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. 

 

महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ राज्य सरकार सुरू करेल. बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ केली जाणार आहे. राज्यातल्या सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी आवश्यक उपकरणं आणि साहित्याच्या खरेदीसाठी ७८ कोटी रुपयांची तरतूद आहे.