मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्या परिसरात मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पाऊस बाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईत अनेक ठिकाणी वेळेआधी तसंच अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. काही ठिकाणी पाणी साचलेल्या पाण्याचा निचरा आता झाला असून वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी वार्ताहरांना दिली.
मुंबईत सध्या नालेसफाई सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. यापूर्वी मान्सूनपूर्व तयारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात आली होती. सर्व यंत्रणा सुसज्ज असून नागरिकांचा त्रास कमी व्हावा याची काळजी घेण्यात येत असून सर्व विभागांशी समन्वय साधला जात असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईत काही ठिकाणी दरड कोसळण्यासंदर्भातही आपण सेफ्टी नेट बांधण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
बारामतीमध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज निंबोडी, शेटफळगढे, मदनवाडी आणि भिगवण इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. य़ावेळी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. गेल्या ४८ तासात बारामतीत ३०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
पुण्याच्या खडकवासला धरणातून पाणी सोडण्याच्या आधी यंत्रणेला सज्ज होण्यासाठी दोन तास आधी सूचना देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पाणीपातळी वाढली असून, इशारा पातळी पाच मीटर असून, सध्या पाणीपातळी सहा मीटरवर आहे. धोका पातळी सात मीटर आहे. खेड ते दापोली रस्ता फुरुसजवळ बंद असून, वाहतूक पालगडमार्गे वळवण्यात आली आहे. दापोली तालुक्यातल्या वणंद गावी राजेंद्र कोळंबे नावाची मध्यमवयीन व्यक्ती वाहून गेली असून, त्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.