महाराष्ट्राचा ६६ वा स्थापना दिन मुंबईत उत्साहानं साजरा केला जात आहे. राज्याच्या स्थापना दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं पार पडला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकवून उपस्थितांना संबोधित केलं. राज्य सरकार सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत असून, आपण सगळ्यांनीच यासाठी एकत्र प्रयत्न करायचं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि इतर अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. या निमित्तानं राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दल, अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा दलांनी केलेल्या शानदार संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली .
मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी, कर्मचारी देखील उपस्थित होते. यावेळी पहेलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना श्रध्दांजलीही अर्पण केली गेली.
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हुतात्मा चौक इथल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानीही ध्वजवंदन केलं.
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र कायमच भारताच्या विकासात सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
साताऱ्यात पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ध्वजवंदन केलं. बीड इथं मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडला.जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ध्वजवंदन केलं. रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात झालं.
परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी तर रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांनी ध्वजवंदन केलं. धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते तर भंडारा इथं पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजवंदनेचा कार्यक्रम झाला. चंद्रपूर इथं पालकमंत्री अशोक उईके यांच्या, हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या, तर अकोला इथं पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तर अहिल्यानगर इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ध्वजवंदन केलं.
बुलढाणा पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे, गोंदियात पालकमंत्री बाबासाहेब पाटील, यवतमाळ मध्ये पालकमंत्री संजय राठोड, वाशिम इथं पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा झाला. नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्त कैलास शिंदे यांनी ध्वजवंदन केलं.