राज्यात थॅलेसिमिया रोगाची चाचणी विवाहाच्या पूर्वी बंधनकारक करण्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न विकास ठाकरे यांनी विचारला होता. प्रत्येक जिल्ह्यात या रोगावरची उपचार केंद्र सुरू केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कर्करोग निदान वाहन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. या आरोपांची आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून चौकशी केली जात असल्याचं बोर्डीकर सांगितलं. हे अधिवेशन संपण्याआधी या चौकशीचा अहवाल सभागृहात सादर करण्याची सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
राज्यात सिटी स्कॅन आणि एम आर आय यंत्रांचा तुटवडा अथवा बंद असलेल्या सर्व ठिकाणी या सुविधा दोन महिन्यात कार्यान्वत करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय पोतनीस यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलं.
वाळू आणि रेती वाहतुकीसाठी चोवीस तास परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जीपीएस प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरा पद्धती लागू केली जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. यानुसार आता संध्याकाळी सहा नंतर महाखनिज या पोर्टलवरून वाहतूक परवाना दिला जाईल असं त्यांनी सांगितलं.