मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थानं बांधायला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसंच, शिवडी न्हावाशेवा अटल सेतूच्या टोलशुल्काला आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुंबईत नागरी परिवहन प्रकल्प टप्पा दोनसाठीच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली. राज्यातल्या युवकांना परदेशात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशिलता आणि क्षमता संस्था स्थापन करायलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
भाजीपाला निर्यातीकरता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगांव इथे मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी पणन महामंडळाला ७ हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी ४ हजार ७७५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.