मुंबईतल्या घाटकोपर इथं गेल्या वर्षी बेकायदा फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भातल्या उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल आज मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत शिफारशींसह स्वीकारला. न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांवरच्या कार्यवाहीचा कृती अहवालही मंत्रिमंडळानं स्वीकारला आणि संबंधित विभागांना एका महिन्यात कार्यवाही करायचे निर्देश दिले.
मुंबईतल्या अंधेरी इथं सरदार वल्लभभाई पटेल नगर इथं म्हाडाच्या माध्यमातून १२२ संस्थांच्या, तसंच ३०७ वैयक्तिक भूखंडावरच्या ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्वसनाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. वसई विरार शहर महानगरपालिकेला मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी आचोळे इथं जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेला मौजे देवळाली इथं १ हजार ५५ चौरस मीटर जागा द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी, तसंच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी द्यायला मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेतून रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामासाठी ४९१ कोटी ५ लाख रुपये खर्चाला मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला. अकोल्यात बसस्थानक, भेंडी बाजार आणि वाणिज्य संकुलासाठी २४ हजार ५७९ चौरस मीटर जागा महापालिकेकडे हस्तांतरित करायला आज मान्यता देण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातल्या मौजे कुंभारी इथल्या डॉक्टर मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेनं विकासकाच्या माध्यमातून बांधलेल्या घरांना मुद्रांक आणि नोंदणी शुल्कात सवलत द्यायचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला.