राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या अंतर्गत एकंदर १ हजार ९०२ पुरस्कार देण्यात येणार आहेत.
महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशीम इथं विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. पिंपरी-चिंचवड इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय, आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना करायला, तसंच या न्यायालयांसाठीच्या पदांना मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तसंच ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानांतर्गत १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.
ई-नाम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करण्यासाठी कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियमन अधिनियम, १९६३मध्ये सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. वर्धा जिल्ह्यात बोर मोठा प्रकल्पाची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी २३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या, तर धाम मध्यम प्रकल्पाची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी १९७ कोटी २७ लाख रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
फिडे महिला बुद्धिबळ विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.