बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते ही नवे योजना अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ५० हजार शेतकऱ्यांच्या १ लाख एकर क्षेत्राला लाभ देण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला. कोकणातल्या उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केली. या अंतर्गत सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत. १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर उर्जा संच खरेदीसाठी सरकार अनुदान देणार आहे. या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे ७० टक्के वीज ग्राहकांचे वीजबील टप्प्या टप्प्याने शून्यावर येईल, असं ते म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर विद्युत यंत्रणा लावण्याची घोषणा त्यांनी आज केली.
येत्या आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेसाठी ३६हजार कोटींचा निधी राखून ठेवला असल्याचं अर्थमंत्री म्हणाले. राज्यातल्या पावणे २ कोटी असंघटीत कामगार आणि शेतमजुरांसाठी सामाजिक सुरक्षा योजना सरकार राबवणार आहे. अनुसूचित जाती उपयोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४२ टक्के, आदिवासी उपयोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के एवढी भरीव वाढ केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्र्यात, छत्रपती संभाजी महाराजांचे संगमेश्वरमध्ये आणि मराठ्यांचे शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपतमध्ये, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे साताऱ्यातल्या नायगावमध्ये, माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी आज केली. रिद्धपूरमधल्या मराठी भाषा विद्यापीठात अभिजात मराठी भाषेच्या संशोधन आणि अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र आणि अनुवाद अकादमी स्थापन केली जाणार आहे. याशिवाय मराठी भाषेच्या संशोधनासाठी पुरस्काराची घोषणा त्यांनी केली २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण तसंच नमामि गोदावरी अभियानाची घोषणा त्यांनी आज केली.