राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भैय्याजी जोशी यांनी मराठीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आज विधीमंडळात गाजला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. यावर मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे ,शिकली पाहिजे आणि शिक्षणही मराठीत घेतलं पाहिजे हीच राज्य सरकारची भूमिका आहे, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं ते म्हणाले. या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या आमदारांनी दुपारी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन आंदोलन केलं.
जोशी यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
विरोधकांना या मुद्द्यावरुन राजकारण करायचं आहे. कुणीही मातृभाषेचा अवमान करु नये ही सरकारची भूमिका आहे, असल्याचं मराठी भाषा मंत्री उदय सामंत विधान भवन परिसरात म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे परदेशातलं पहिलं मराठी ग्रंथालय जपानमध्ये सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मराठी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा आहे यात दुमत नाही, आणि बाहेरुन आलेल्यांना ती समजायलाच हवी असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी म्हटलं आहे. मुंबईत मराठी भाषा येण्याविषयी आपल्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचं ते म्हणाले. मराठी ही आपली स्थानिक भाषा असून त्याचा आपल्याला अभिमान असल्याचं ते म्हणाले.