मुंबईत आज आयफा स्टील महाकुंभ या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनानं विविध स्टील कंपन्यांबरोबर जवळपास ८१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या करारांमुळे ४० हजारापेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, साताऱ्यात हे प्रकल्प येणार आहेत. यातून राज्यातल्या स्टील उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते आज आयफा स्टीलेक्स २०२५ चं मुंबईत उद्घाटन झालं. राज्यातल्या स्टील उद्योगात आतापर्यंत ८० हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावानं ओळखलं जाणारं गडचिरोली पुढे देशाची नवी स्टील सिटी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हरित स्टील क्षेत्रात राज्याला आघाडीवर आणायचा संकल्पही असल्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
गडचिरोलीत उद्योगसाठी जमीन अधिग्रहित करायला गरजेनुसार अधिकारी उपलब्ध करून देऊ, मात्र ठरलेल्या वेळेत उद्योग उभारून तिथं रोजगार वाढवा, असं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलं.
देशात सन २०३० पर्यंत ३० कोटी टन स्टील उत्पादनाचं लक्ष्य ठेवलं असून त्यापैकी किमान ५ कोटी हरित टन स्टील निर्यात करायचं उद्दिष्ट असल्याची माहिती नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. जगातल्या कार्बन कर धोरणांमुळे ग्रीन स्टील आता अपरिहार्य ठरत असल्याचं ते म्हणाले.