राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एआयचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. शासनाच्या कृती आराखड्यानुसार होणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विविध विभाग आणि पातळीवर उत्कृष्ट काम करत असलेल्या १५ विभागांच्या कामांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. नाविन्यपूर्ण काम केलेल्या अधिकारी आणि कार्यालयांचे कौतुक करून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. यात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमधली पोलीस कार्यालयं, महापालिका, जिल्हाधिकारी अशा विविध कार्यालयांचा समावेश आहे.
आराखड्यानुसार १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर विभाग आणि जिल्हा पातळीवर झालेल्या कामांचं समीक्षण आणि मूल्यमापन केलं जाईल. त्या आधारावर उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना १ मे रोजी सन्मानित केलं जाईल, असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसंच, ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विभागांची नकारात्मक दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.