यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे नुकसानी झालेल्या शेतकऱ्यांना आता ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आहे. याकरता विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुमारे ८ हजार १३९ कोटी रुपये इतक्या रकमेचं अर्थसहाय्य वितरित करण्याचे शासन निर्णय जारी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागात बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात मिळून ३४६ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये देण्यात येतील. नागपूर विभागात नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात मिळून सात कोटी ५१ लाख ७५ हजार रुपये, तर नाशिक विभागातल्या नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून ५९ कोटी ३६ लाख १३ हजार रुपये मदत देण्यात येईल. अमरावती विभागात अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात १३१ कोटी ५६ लाख ४७ हजार रुपये, तर पुणे विभागात सोलापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी ३७ लाख २० हजार रुपये मदत मिळेल. कोकण विभागात ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी दोन लाख १६ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.